अशी होती जिवलग मित्रांची साथ की अखेरच्या प्रवासातही दोघेही गेले मिळून स्वर्गात
चंद्रपूर : दोन जीवलग मित्राची भेट होती साथ की अखेरच्या प्रवासात सुद्धा दोघेही एकाचवेळी स्वर्गात गेल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे बिनबा गेट परिसरातील शांतीधामजवळ रविवारी रात्री झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. दुचाकीसमोर अचानक डुक्कर आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीची डुकराला धडक बसून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने बालाजी वॉर्ड परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवार, २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास रोहित मनोज शिंदे (२८), मयंक अनुप शर्मा (३०) आणि साहिल महादेव बुरडकर (२०), तिघेही रा. बालाजी वॉर्ड, चंद्रपूर, हे दुचाकी क्रमांक एमएच ३४ बीयू ६७५२ ने चिंचाळा येथून चंद्रपूरच्या दिशेने येत होते.
बिनबा गेट परिसरातील शांतीधामजवळ कुमार ट्रान्सपोर्टसमोर दुचाकी आली असता अचानक एक डुक्कर रस्त्यावर आडवा आला. दुचाकीचा वेग असल्याने चालकाला वाहनावर नियंत्रण मिळविता आले नाही. दुचाकीची डुकराला जोरदार धडक बसली. धडकेनंतर तिघेही दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात रोहित शिंदे आणि मयंक शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. साहिल बुरडकर गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिल्यानंतर जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर रोहित शिंदे आणि मयंक शर्मा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
गंभीर जखमी साहिल बुरडकर याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मृत रोहित शिंदे, मयंक शर्मा आणि जखमी साहिल बुरडकर हे तिघेही बालाजी वॉर्डातील रहिवासी असून त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. नेहमी एकत्र फिरणाऱ्या तीन मित्रांपैकी दोघांचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे पुढील तपास करीत आहेत.

