लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूची चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी

0

लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूची चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी




अहेरी: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कापेवंचा गावात लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर बाळाच्या आई-वडिलांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारा लेखी अर्ज त्यांनी विविध वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाकडे सादर केला आहे.




कापेवंचा हे गाव अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिली व आरोग्य उपकेंद्र कोडसपल्ली यांच्या कार्यक्षेत्रात येते. अर्जानुसार, कापेवंचा गावातील आदिवासी समाजातील आदिम जमातीच्या कुटुंबातील दोन महिन्यांच्या बाळाला ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता आरोग्य विभागाच्या पथकाकडून लसीकरण करण्यात आले.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गावातील आरोग्य सेविका,
MPW, कंत्राटी आरोग्य सेवक व आशा वर्कर हे चौघे घरी आले होते. बाळाला लसीकरण देण्यात येणार असल्याचे सांगून त्याला चार इंजेक्शन आणि दोन औषधी डोस देण्यात आले. त्यामुळे एकाच वेळी बाळाला एकूण सहा प्रकारचे औषधांचे
डोस देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी अर्जात केला आहे.

लसीकरणानंतर काही वेळातच बाळाची प्रकृती बिघडल्यासारखी दिसू लागली. बाळ अस्वस्थ झाल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले आहे. त्यानंतर बाळाने दूध पिणे बंद केले. सायंकाळनंतर बाळाला झोप लागत होती. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान बाळाचे शरीर थंड पडल्यासारखे जाणवले, त्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांनी अर्जात म्हटले आहे.

या घटनेची माहिती कुटुंबीयांनी गावकऱ्यांना तसेच आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी - कर्मचाऱ्यांना दिली. मात्र, बाळाची प्रकृती खालावत असताना आरोग्य विभागाकडून तत्काळ वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, लसीकरणापूर्वी बाळाला कोणताही आजार किंवा आजाराची लक्षणे नव्हती, असेही त्यांनी नमूद केले आहे.

बाळाच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन (PM) केले. मात्र, शवविच्छेदनावेळी किंवा त्यानंतर संबंधित आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी बाळासोबत उपस्थित नसल्याचा आरोपही अर्जात करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडेही तक्रार करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले आहे.
घटनेनंतर ९ सप्टेंबर २०२६ रोजी अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम, त्यांचे पुत्र हर्षवर्धन बाबा आत्राम, डॉ. मितालीताई आत्राम, जिल्हास्तरीय आरोग्य विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच राजाराम पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी कापेवंचा गावाला भेट देऊन कुटुंबीय व ग्रामस्थांकडून घटनेची माहिती घेतल्याचे अर्जात नमूद आहे.
या चर्चेदरम्यान आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा मुद्दा समोर आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचे जिल्हास्तरीय व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचा दावाही अर्जात करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे
बाळाच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसताना, लसीकरणानंतरच बाळाचा मृत्यू झाल्याने या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. लसीकरणाची प्रक्रिया, देण्यात आलेली इंजेक्शने व औषधे, त्यांचे प्रमाण, लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पात्रता, बाळाची लसीकरणापूर्वीची स्थिती, लसीकरणानंतर करण्यात आलेली देखरेख तसेच उपचारासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कुटुंबीयांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आबिटकर, आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. आशोक उईके, आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिली येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य उपकेंद्र कोडसपल्ली येथील डॉक्टर व कापेवंचा गावातील संबंधित आरोग्य सेविका यांच्यावर चौकशीपूर्वक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, लसीकरणामुळेच बाळाचा मृत्यू झाला का, अथवा अन्य कोणते वैद्यकीय कारण होते, हे शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय तपासणी आणि तज्ज्ञांच्या चौकशीतून स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांपेक्षा या घटनेची पारदर्शक वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी जोर धरत आहे. मृत बाळाचे आई-वडील श्यामराव दोगे तलांडी व सुनीता श्यामराव तलांडी यांनी दोषींवर कठोर कारवाई करून आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !