दोन सख्ख्या भावंडांच्या वादाचा दुर्दैवी अंत
काठीच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू
सावली : - घरगुती कारणावरून दोन सख्ख्या भावंडांमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची घटना सावली तालुक्यातील केशरवाही येथे सोमवारी रात्री घडली. या घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या आशिष भोयर (वय २५) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भोयर आणि रुपेश भोयर हे सख्खे भाऊ आहेत. घरगुती तसेच किरकोळ कारणांवरून दोघांमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी झालेल्या झटापटीत आशिष यांच्या डोक्याला काठीने मार लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या घटनेत आशिष गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने सावली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनेचे नेमके कारण, वादाची पार्श्वभूमी आणि हल्ल्याची संपूर्ण परिस्थिती याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील कायदेशीर कारवाई तपासाअंती करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

