प्रकल्पासाठी सुपीक जमिनी बळजबरीने अधिग्रहित करण्याचा अट्टाहास कशासाठी ? - शेतकरी नेते प्रकाश पोहरे
येणापूर :-
जिल्ह्यात उद्योग यावेत, रोजगार निर्माण व्हावा आणि विकासाला गती मिळावी, याबाबत कुणाचेही दुमत नाही. मात्र, हा विकास साधण्यासाठी पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या सुपीक जमिनीच बळजबरीने अधिग्रहित करण्याचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल देशोन्नतीचे मुख्य संपादक तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी उपस्थित केला. शासनाकडे हजारो हेक्टर पडीत जमीन आणि झुडपी जंगल उपलब्ध असताना एमआयडीसी, विमानतळ व अन्य प्रकल्पांसाठी सुपीक शेतीचा बळी देण्याच्या धोरणाचा त्यांनी जाहीर निषेध केला.
चामोर्शी तालुक्यातील येनापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांतील जमिनी प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी संपादित करण्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी आयोजित सर्वपक्षीय सहविचार सभेत पोहरे बोलत होते. या सभेला परिसरातील शेकडो शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक व नागरिक उपस्थित होते. सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले असतानाही अनेक लोकप्रतिनिधींनी सभेकडे पाठ फिरविल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
एमआयडीसी अथवा विमानतळासाठी जमीन मिळविताना शासनाकडून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता एकजुटीने लढा उभारावा, असे आवाहन पोहरे यांनी केले. भूसंपादनाची अधिसूचना तात्काळ रद्द करून प्रकल्पांसाठी पर्यायी जागांचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. येनापूर-जयरामपूर परिसरातील बहुतांश जमीन सिंचनाखाली असून अनेक शेतकरी वर्षातून तीन पिके घेतात. अशा जमिनी गेल्यास शेतकरी भूमिहीन होतील आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. "शेतकऱ्यांची उपजीविका उद्ध्वस्त करून साधला जाणारा विकास हा विकास नव्हे. उद्योग जरूर आणा; मात्र सुपीक शेतीच्या किंमतीवर नको," अशी ठाम भूमिका पोहरे यांनी मांडली. पिढ्यानपिढ्या घाम गाळून कसलेल्या जमिनीपासून शेतकऱ्यांना बेदखल करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैलबंडीवरून पोहरे यांची जंगी मिरवणूक
सभेपूर्वी येनापूर-जयरामपूर परिसरातील १३ गावांतील शेतकऱ्यांनी प्रकाश पोहरे यांचे पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत केले. येनापूर चौकापासून कार्यक्रमस्थळापर्यंत बैलबंडी रॅली काढून पोहरे यांची सजविलेल्या बैलबंडीवरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी "प्रकाश पोहरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं", "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेषतः महिला शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती या आंदोलनाच्या निर्धाराची साक्ष देत होती.

