अवैध दारू तस्करी करणाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी दिला दनका दोन कारवायांत २२ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
 अवैध दारू तस्करी करणाऱ्यांना गडचिरोली पोलिसांनी दिला दनका दोन कारवायांत २२ लाख ९९  हजारांचा मुद्देमाल जप्त






गडचिरोली, दि. १ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस ठाणे आणि आष्टी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने ३० व ३१ जुलै रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून केलेल्या कारवाईत दोन चारचाकी वाहनांसह एकूण २२ लाख ९९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात प्रभावी कारवाई सुरू असून त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
३० जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरमोरीकडून गडचिरोलीच्या दिशेने एमएच-३३ एडी-३१९२ क्रमांकाच्या मारुती सुझुकी बलेनो कारमधून देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व गडचिरोली पोलीस ठाण्याच्या पथकाने आरमोरी मार्गावर नाकाबंदी करून वाहन ताब्यात घेतले.वाहनातील प्रमोद दिलीप भोयर (वय ३३, रा. गोकूलनगर, गडचिरोली) व मुकेश प्रकाश बोधलकर (वय ३८, रा. गोकूलनगर, गडचिरोली) यांची चौकशी केली असता वाहनातून मोठ्या प्रमाणात रॉयल स्टॅग, रॉकेट संत्रा देशी दारू, सह्याद्री गोल्ड प्रीमियम व्हिस्की, ऑल सिझन डबल कॅश कनेक्शन रिझर्व्ह व्हिस्की आदी मद्यसाठा आढळून आला.
या कारवाईत मद्यसाठ्यासह बलेनो कार असा ७ लाख ६० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १०३८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(अ), ९८ व ८३ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि. दीपक दादाराव मोहिते करीत आहेत.
३१ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अब्दुल फरहान शेख (वय २४, रा. जलनगर, चंद्रपूर) हा एमएच-३४ बीझेड-७६१७ क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअपमधून पोस्टे आष्टी हद्दीत देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व आष्टी पोलीस ठाण्याच्या पथकाने मौजा येणापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ नाकाबंदी करून वाहन ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान वाहनातून ९० मिली देशी दारू, रॉयल स्टॅग, इम्पिरियल ब्ल्यू, हायवर्ड ५००० तसेच बडवाईजर मॅग्नम बिअरचा मोठा साठा आढळून आला.

या कारवाईत बोलेरो पिकअपसह १५ लाख ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ०२२६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(अ) व ९८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अब्दुल फरहान शेख याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. काशिनाथ शेडमाके करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे 

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !