भामरागडमध्ये पूरस्थिती ओसरली; प्रशासनाकडून घराघरांत नुकसानीची केली पाहणी
राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, महावितरण व दूरसंचार विभागांना तातडीने दुरुस्तीचे दिले निर्देश
गडचिरोली, दि. 1 (जिमाका): दिनांक 30 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा आणि पामुलागौतम नदीला मोठा पूर आला होता. परिस्थिती आता सामान्य असून पूर ओसरल्यानंतर प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अमर राऊत आणि तहसीलदार किशोर बागडे यांनी पूरग्रस्त वस्त्यांमध्ये घराघरांत जाऊन नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पूरामुळे झालेल्या घरगुती व इतर साहित्याच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली तसेच नागरिकांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पूरामुळे बाधित झालेल्या पायाभूत सुविधांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच दूरसंचार विभागाचा अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळांना भेट देऊन नुकसानाचा आढावा घेण्याचे आणि रस्ते, वीजपुरवठा तसेच दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यासाठी तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रशासनामार्फत पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नुकसानाचे पंचनामे, मदत वितरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक माहिती द्यावी तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

