गुन्हे मागे घ्या, जमीन अधिग्रहण थांबवा!
आष्टीत शेतकऱ्यांचा चक्का जाम; डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संतापाचा उद्रेक
मुधोली-जैरामपूर परिसरातील चौदा गावांतील शेतकऱ्यांचे आंदोलन; तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या, तोडगा न निघाल्याने रस्त्यावर उतरले शेतकरी
आष्टी, दि. ७ ऑगस्ट :
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला आहे. मुधोली-जैरामपूर परिसरातील चौदा गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शुक्रवारी आष्टी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल आंदोलन केले. तब्बल तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या देऊनही कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी सायंकाळी चार वाजल्यापासून आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्का जाम आंदोलन सुरू केले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ९ जुलै २०२६ रोजी ड्रोनद्वारे मुधोली परिसरात शेतमोजणी सुरू असताना तीन कर्मचाऱ्यांना नागरिकांनी पकडले होते. त्यांना मारहाण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शाळेच्या इमारतीत सुरक्षित ठेवले होते.
या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने पुढे आलेल्या काही व्यक्तींविरुद्ध ११ जुलै रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
‘आमच्या पोटाची खळगी असलेली जमीन हिरावून घेऊ नका’
शेतकऱ्यांचा मुख्य आक्षेप प्रस्तावित जमीन अधिग्रहणाला आहे. शेतजमीन कोणतीही योग्य भरपाई न देता अथवा शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय अधिग्रहित करू नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. हीच जमीन आमच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असून, ती गेल्यास शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
सात शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
विनोद भोयर, गुरुदास आभारे, वसंत पूरमवार, गुरुदास ठुसे, सुधाकर गद्दे, नेमा घोगरे आणि विवेक खोब्रागडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.
पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या आंदोलन करूनही प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी अखेर आष्टी चौकात रस्ता रोकोचा मार्ग स्वीकारला.
‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार’, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वृत्त लिहिपर्यंत प्रशासनाकडून आंदोलनाबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नव्हता.
रस्ता रोको आंदोलनामुळे आष्टी परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

