स्मार्ट मीटर्स सक्तीच्या विरोधात गडचिरोली येथे जोरदार निदर्शने

0
स्मार्ट मीटर्स सक्तीच्या विरोधात गडचिरोली येथे जोरदार निदर्शने


गडचिरोली, (अशोक खंडारे)-५ ऑगस्ट -- येथील  'महावितरण अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी विविध राजकीय पक्षांचे वतीने स्मार्ट मीटर्सच्या सक्तीच्या बसवण्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. 
पोटेगाव मार्गावरील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर मोठ्या संख्येने आणि नागरिक जमा झाले आणि त्यांनी स्मार्ट मीटर्स बसवण्याविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यानंतर, मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले निवेदन अधीक्षक अभियंत्यांमार्फत सादर करण्यात आले. 
स्मार्ट मीटर्स बसवल्यामुळे वीज बिले वाजवी रकमेपेक्षा दोन ते तीन पट अधिक येत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांनी स्मार्ट मीटर्स बसवले जाणार नाहीत, अशी घोषणा केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर भाजप प्रत्येक घरात स्मार्ट मीटर्स बसवण्याची योजना वेगाने राबवत असल्याचा आरोप नेत्यांनी केला. 
महाराष्ट्रात देशातील सर्वात महाग वीज आहे; स्मार्ट मीटर प्रणाली ही प्रीपेड मोबाईल सेवेप्रमाणे काम करणार असून त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. 
स्मार्ट मीटर्सना विरोध करणाऱ्या ग्राहकांकडून गोळा केलेल्या अर्जांचा संच अधीक्षक अभियंत्यांना सादर करण्यात आला. यात स्मार्ट मीटर्स सक्तीने बसवू नयेत, तसेच परवानगीशिवाय बसवलेले मीटर्स काढून त्याऐवजी जुने मीटर्स बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. 
अधीक्षक अभियंत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांनी तक्रारींची चौकशी करण्याचे, वाढीव बिले कमी करण्याचे आणि असामान्य वेगाने फिरणारे मीटर्स बदलून देण्याचे आश्वासन दिले. 
वीज दर वाढवून ग्राहकांकडून खर्च वसूल करण्याचा महावितरणचा मानस आहे. त्यामुळे, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि सतत वाढणाऱ्या वीज दरांविरुद्ध निषेध नोंदवण्यासाठी ही निदर्शने करण्यात आली. 
या आंदोलनाचे नेतृत्व सीपीआयचे राज्य सचिव डॉ. महेश कोपुलवार, ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, सीपीआयचे जिल्हा सचिव कॉम्रेड देवराव चावले, बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी केले. तसेच ॲड. जगदीश मेश्राम, प्रा. प्रकाश दुधे, प्रा. राजन बोरकर,  प्रदीप भैसारे, तुलाराम राऊत, सचिन मोटकुरवार, सूरज जक्कुलवार, रोहिदास फुलझेले, जलील शेख, चन्नीलाल मोटघरे, अरविंद वाळके, कल्पना रामटेके, सुमित्रा राऊत, शशिकला सहारे, लीलाबाई कोटांगले, दीपक वालदे  यांच्यासह शेकडो नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !