भूमी अधिग्रहण विरोधात १४ गावांतील शेतकऱ्यांचा विराट मार्च
हजारोंच्या उपस्थितीत शांततामय पदयात्रा; “जमीन वाचवा, शेतकरी वाचवा!
आष्टी (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील
एमआयडीसीच्या प्रस्तावित भूमी अधिग्रहण विरोधात १४ गावांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) अभूतपूर्व एकजूट दाखवत हजारोंच्या उपस्थितीत भव्य शांततामय पदयात्रा काढली. शेतकरी कृती समिती (जैरामपूर–येनापूर परिसर) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सरकारच्या भूमी संपादन धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
सकाळी ११ वाजता लक्ष्मणपूर येथून पदयात्रेला प्रारंभ झाला. लक्ष्मणपूर–दुर्गापूर–किष्टापूर–चित्तरंजनपूर मार्गे येनापूरपर्यंत संविधानिक आणि अहिंसक मार्गाने ही पदयात्रा काढण्यात आली. “जमीन वाचवा – भविष्य वाचवा”, “शेती आमचा श्वास, जमीन आमचा विश्वास” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचा उत्साह, शिस्त आणि निर्धार विशेष लक्षवेधी ठरला.
येनापूर मंडळ कार्यालयात पदयात्रेची सांगता झाली. त्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार प्रशांत घोरूडे यांना निवेदन देत प्रस्तावित भूमी संपादन तातडीने रद्द करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या पदयात्रेत जैरामपूर, मुधोली चक क्र. २, मुधोली तुकूम, चित्तरंजनपूर, किष्टापूर, येनापूर, दुर्गापूर, सेलूर, लक्ष्मणपूर, गणपूर, विठ्ठलपूर, यादवपल्ली, पारडीदेवसह परिसरातील अनेक गावांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हजारोंच्या उपस्थितीतीमुळे जन आंदोलनाचे स्वरूप दिसून आले
यावेळी शेतकऱ्यांनी " सुपीक शेतजमीन आमचं कुटुंब चालवत असते, आमचे अस्तीत्व व भावी पिढीला पुरेल इतकं भविष्य आहे जबरदस्तीने जमीन अधिग्रहण केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन तिव्र करु विराट मार्च काढून शेतकऱ्यांनी शासनास संदेश पोहोचला आहे आमच्या हक्काच्या शेतजमीनीचे संरक्षण करण्यासाठी अखेरचं स्वासापर्यत लढत राहू असा निर्धार केला आहे

