पोलिसांना गुंगारा देत जंगलात नेली XUV तरीही वाहनासह ८.२४ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
गडचिरोली, दि. १२ जुलै : पोलीसांना गुंडाळून देत जंगलात नेली XUV तरीदेखील पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करुन वाहनासह अवैध दारुसाठा जप्त केला जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख २४ हजार रुपयांचा अवैध दारूसाठा व चारचाकी वाहन जप्त केले. कारवाईदरम्यान पोलिसांना चकवा देत आरोपी जंगलाच्या दिशेने पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या पथकाला ११ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली. एमएच-४९ एई-५९२५ क्रमांकाच्या लाल रंगाच्या महिंद्रा XUV मधून अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुनघाडा फाटा येथे सापळा रचण्यात आला.
दरम्यान, संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक राजेंद्र सपन मंडल (वय २७, रा. कुनघाडा, ता. चामोर्शी) याने वाहनाला यू-टर्न घेत पळ काढला. या धावपळीत त्याने रस्त्यावरील एका अन्य चारचाकी वाहनाला धडक दिली. पोलिसांचे वाहन अडकल्याने त्यांनी तत्काळ एका खासगी वाहनाच्या मदतीने पाठलाग सुरू केला. टायरच्या खुणा आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोध घेत असताना आरोपीने नवरगाव जंगल परिसरात वाहन सोडून जंगलाचा फायदा घेत पलायन केले.
पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला. यात ३५ बॉक्समध्ये ३,५०० बाटल्या रॉकेट संत्रा देशी दारू (२.८० लाख रुपये), २४ कॅन हॅवर्ड्स ५००० बिअर (७,२०० रुपये), रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या ४८ निपा (१६,८०० रुपये), १०० निपा रॉयल स्टॅग (२० हजार रुपये) तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा XUV (अंदाजे ५ लाख रुपये) असा एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८१, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ), ९८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाहू दंडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

