एटापल्लीत पुन्हा नक्षली सावट! कुंडमजवळ बॅनर-पत्रकांनी खळबळ; कंपन्या व ड्रोन सर्वेक्षणाला विरोधाचे आवाहन
'विरोध केला नाही तर परिणाम भोगावे लागतील' अशी धमकी; मार्क्सवादी नावाच्या पत्रकाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह
एटापल्ली, ता. १२ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या हालचालींची चर्चा रंगली आहे. तालुक्यातील कुंडम परिसरात नक्षली बॅनर आणि पत्रके आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या पत्रकांमधून नागरिकांना विविध कंपन्या, खाण प्रकल्प आणि ड्रोनद्वारे सुरू असलेल्या सर्वेक्षणाला सामूहिक विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले असून, विरोध न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीवजा चेतावणी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंडम परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर व पत्रकांमध्ये विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या विविध कंपन्यांच्या हालचाली आणि ड्रोन सर्वेक्षणावर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन या कामांना विरोध करावा, अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पत्रकातून देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, हे पत्रक मार्क्सवादी नावाने प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हे पत्रक खरोखरच संबंधित संघटनेचे आहे की दिशाभूल करण्यासाठी अन्य कुणीतरी प्रसारित केले आहे, याबाबत साशंकता व्यक्त होत असून पत्रकाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी परिसरात तपास व शोधमोहीम सुरू केली असून, बॅनर व पत्रकांची सत्यता, त्यामागील उद्देश आणि संबंधितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. संवेदनशील भाग असल्याने या घटनेनंतर परिसरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे एटापल्ली तालुक्यात पुन्हा एकदा नक्षली हालचालींची चर्चा सुरू झाली असून, स्थानिक नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

