शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर गडचिरोलीत जल्लोष; इंदिरा गांधी चौकात फटाके फोडून आनंदोत्सव
गडचिरोली (अशोक खंडारे):-
दिल्ली येथील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
या निर्णयानंतर CJPसह विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी देशभरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला.
याच पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत फटाके फोडून व घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी आंदोलकांनी "हा विजय कोणत्याही एका पक्षाचा नसून देशातील विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाचा विजय आहे," अशी भावना व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जनआंदोलनाची ताकद दाखवून दिल्याचेही आंदोलकांनी सांगितले.
जल्लोष साजरा केल्या नंतर NEET पेपर फुटी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जल्लोष साजरा करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते नगरसेवक बाळू टेम्भूर्णे, जि के बारसिंगे, आजाद समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, सोनाशी लभाने, डॉ. प्रशांत सातार, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री वेळदा, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कविता मोहरकर, नागसेन खोब्रागडे, प्रकाश बन्सोड, प्रतीक डांगे, सक्षम रामटेके, यश गलगठ, पूजा गिरी, सुरेंद्र वासनिक तथा विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

