तळिरामांच्या खिशाला लागतोय चुना, एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू विक्री शासनाचे दुर्लक्ष
गोंडपिपरी: :-
शहरासह ग्रामीण भागातील सरकारमान्य देशी, विदेशी दारू दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत सध्या एमआरपी दरापेक्षा जास्त दराने दारूविक्री करीत असल्याचा प्रकार सुरू आहे.त्यामुळे शासनाचे सदर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र शासनाने अधिकृत दर निश्चित केले असूनही परवानाधारक दारू दुकानदारांनी नियमाचे पालन न - करता ग्राहकांकडून अवैधरित्या अतिरिक्त पैसे वसूल करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. यामुळे मद्य सेवन करणाऱ्यांच्या खिशाला चुना लावला जात असून, त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे योग्यरित्या देखरेख नसल्याने, परवानाधारक देशी, विदेशी दारूविक्री करणाऱ्या दुकानदारांना मनमानी करून अधिक नफा करण्याची संधी मिळत आहे. तर याकारणाने मद्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 'एमआरपी' हा व्यवसाय तसेच किरकोळ क्षेत्रात वापरला जाणारा शब्द आहे. हा शब्द अंतिम ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या सर्वोच्च किमतीला सुचित करते. एमआरपीमध्ये सर्व कर, पॅकेजिंग खर्च आणि उत्पादन किरकोळ विक्रीच्या सेल्फवर पोहोचेपर्यंत होणारे इतर कोणतेही खर्च समाविष्ट असतात.
एमआरपी ही संकल्पना ग्राहक आणि उत्पादक दोघांसाठी आवश्यक असते, कारण ती किमतीमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करून, ग्राहकांना किमतीच्या शोषणापासून वाचवते. किरकोळ विक्रेत्यांना उत्पादनासाठी विशेषतः आवश्यक वस्तूसाठी जास्त किमती आकारण्यापासून रोखण्यासाठी हे एक 'बेंच मार्क' म्हणून काम करते. मात्र गोंडपिपरी परिसरात बियर, देशी, विदेशी दारूची चढ्या दराने विक्री केली जात आहे. राज्य उत्पादक शुल्क विभागाने पुढाकार घेऊन कारवाई करावी, अशी मद्यप्रेमींची मागणी आहे.

