तारसा ग्रामसभेत चक्क ग्रामपंचायत कमेटी बरखास्तीचा घेतला ठराव!
गोंडपिपरी : गावाच्या समृद्ध सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण काम करण्याची संधी सरपंच व ग्रामस्थांना व्हावी या उदात्त हेतूने १७ सप्टेंबर २०२५ पासून मुख्यमंत्री पंचायतराज अभियान संपूर्ण महाराष्ट्रात रबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभाचे आयोजन करून गाव विकासाचे नियोजन करण्याच्या सूचना सर्वत्र देण्यात आल्या. त्यानुसार पंचायत समिती गोंडपिपरी अंतर्गत येणार्या ग्रामपंचायत तारसा बुज येथे ग्रामसभा घेण्यात आली. आणि त्या सभेला गावाचे प्रथम नागरिक सरपंच, उपासरपंचतथा सदस्य या पैकी एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने ग्रामसभेला उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कमेटी बरखास्तीचा ठरावं एकामताने घेतला असून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे
गावाचा विकास साधण्यासाठी, गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिकांचे प्रश्नांचे निराकरण करून उपाययोजना राबवून विकासात्मक उपक्रम व विकास कामांची मागणी ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कमिटी ठराव पारित करतं असते. ग्रामसभा म्हणजे ग्रामस्थांसाठी न्यायालयच असते. मात्र या ग्रामसभेत चक्क तारसा (बुज) येथील ग्रामपंचायत कमिटीलाच बरखास्त करण्याचा ठराव गावकऱ्यांनी घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या बदलाची शक्यता नाकारता येत नाही
दि. १७, बुधवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावविकासाच्या दृष्टीने तारसा बूज येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत मध्ये ९ ग्रामपंचायत सदस्यांची संख्या आहे अशातच २ सदस्यांनी यापूर्वी राजीनामा व १ सदस्य मृतक असल्याने सध्या स्थितीत ६ सदस्य गावाचा कारभार चालवतात. बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असता चक्क सरपंच, उपसरपंच व एकही सदस्य उपस्थित नसल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत संपूर्ण कमिटी बरखास्त करण्यासंबंधी सभेचे अध्यक्ष नितीन धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेतला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी चक्क ग्रामसभेचा ठरवच मंजूर करून घेतला असून गोंडपिपरीचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

