ट्रकला टोचन करुन नेत असताना ट्रॅक्टर झाला पलटी, ट्रॅक्टरखाली दबुन चालक ठार
देसाईगंज (गडचिरोली):- देसाईगंज तालुक्याच्या
कोंढाळा येथील एका २९ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टरखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार १७ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास आरमोरी-देसाईगंज मार्गावर घडली. यात प्रशांत राजू बोरूले रा. कोंढाळा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली असे मृत ट्रॅक्टर चालक तरुणाचे नाव आहे.
कोंढाळा गावापासून दोन किलोमिटर अंतरावर आरमोरी मार्गे चुव्याची धोडीनाला नजिक एका ट्रकमध्ये बिघाड आल्याने प्रशांत बोरूले हा दुपारी १२ वाजताच्या दरम्यान विना ट्रॉली ट्रॅक्टर घेऊन गेला होता. ट्रक सुरू होत नसल्याने तसेच ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक आणि ट्रॅक्टरला मोठे दोरखंड (टोचन) बांधून कोंढाळा गावाकडे घेऊन येत होते. अश्यातच धोडीनालावरील मुख्य मार्गावर खोलगट भाग असल्याने ट्रॅक्टरचा वेग वाढल्याने ट्रॅक्टर चालक प्रशांतने ट्रॅक्टरचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ट्रकला बांधलेला दोरखंड ढील होऊन ट्रॅक्टरच्या चाकात येऊन ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला प्रशांत ट्रॅक्टरखाली दबल्या गेला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत पोलीस पाटील किरण कुंभलवार यांना माहिती दिली. कुंभलवार यांनी देसाईगंज पोलीस ठाण्यास माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल होत ट्रॅक्टर खालील मृतदेह बाहेर काढून देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेनासाठी पाठवला. घटनेचा पुढील तपास देसाईगंज पोलीस प्रशासन करीत आहेत विशेष म्हणजे, मृत प्रशांतच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. अश्यातच आता कमावत्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. प्रशांतच्या पश्चात चार वर्षाची मुलगी, पत्नी, मोठा भाऊ व आई असा परिवार आहे.