दिरानेच केला वहिनीचा गळा आवळून खून
यवतमाळ : -
तालुक्यातील मंगरूळ येथील बेपत्ता महिलेचा कुजलेला व जळालेल्या अवस्थेत मृतदेह १० डिसेंबरला शेतात आढळला होता. मृतकाच्या पतीची तक्रार आणि यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या तपासातून दीरानेच महिलेचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.
साधना संजय जोगे ४०, रा. मंगरूळ असे मृत महिलेचे तर मारेकरी नाना उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे (३०) असे मारेकऱ्याचे नाव आहे. याबाबत मृतक महिलेचा पती संजय लक्ष्मण जोगे (५०) यांनी १४ डिसेंबर रोजी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. मृतक महिला ३० नोव्हेंबर रोजी सकाळी तुरीच्या शेंगा तोडण्यासाठी स्वतःच्या शेतात गेली होती. मात्र त्यानंतर महिला घरी परतलीच नाही.
त्यामुळे पतीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली
पोलिसांनी नोंद घेऊन महिलेचा शोध सुरू केला होता. दरम्यान १० दिवसांपासून शोध लागत नसताना अकराव्या दिवशी १० डिसेंबरला महिलेचा कुजलेल्या व जळालेल्या अवस्थेत शेताच्या धुऱ्या लगत असलेल्या खरोटे यांच्या शेतातील ऊसपिकात मृतदेह आढळला. महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे खुनाचा संशय निर्माण झाला दरम्यान पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू असतानाच मृतक महिलेचा पती संजय जोगे यांनी पोलिसांत भावाविरोधात तक्रार दिली. शेतीच्या हिस्स्याच्या वादातून तसेच एक एकर शेतीची विक्री करण्यास अडथळा आणत असल्याने खून केल्याचे त्यामध्ये नमूद केले. महिलेचा बेपत्ता झाल्याच्या दिवशीच ३० नोव्हेंबरला गळा आवळून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने धुऱ्यालगत असलेल्या उसाच्या शेतात मृतदेह फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी दिरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे

