संतप्त ग्रामस्थांनी सरपंच, सचिव, सदस्यांना साडेतीन तास ग्रामपंचायत मध्ये ठेवले डांबून

0
संतप्त ग्रामस्थांनी सरपंच, सचिव, सदस्यांना साडेतीन तास ग्रामपंचायत मध्ये ठेवले डांबून



 चंद्रपूर जिल्ह्यातील देवपायलीची घटना 



चंद्रपूर:-
मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कर वाढ करण्यात आल्यामुळं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सरपंच, सचिव आणि ग्रामपंचायत सदस्यांना तब्बल साडेतीन तास डांबून ठेवल्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील देवपायली गावात घडला.

नागभीड तालुक्यातील देवपायली ग्रामपंचायतीत बुधवारी (ता. 29) ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. ग्रामसभेत मालमत्ता व पाणीपट्टी कर वाढविण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड संतापले, 

करवाढ करण्यात येत असल्याची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यालयात डांबले. तब्बल साडेतीन तास ही मंडळी कुलूपबंद होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देवपायली गाठले. ग्रामस्थांची समजूत काढण्यात आली.

त्यानंतर ग्रामस्थांनी कुलूप काढले व सदस्यांची मुक्तता केली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या देवपायली ग्रामपंचायत मध्ये यापूर्वी 7 नोव्हेंबरला ग्रामसभा बोलाविण्यात आली होती. परंतु सभा तहकूब करण्यात आली. तहकूब झालेली ही ग्रामसभा बुधवारी घेण्याचं ठरलं. सभेला सरपंच अरविंद कोहपरे, ग्रामसेवक प्रशांत दोडके, सदस्य अर्चना ठाकरे, इंदिरा नवघडे, मोरेश्वर नवघडे, वैशाली भोयर यांची उपस्थिती होती. सरपंचांनी सभेला सुरुवात केली. काही वेळातच ग्रामसभा संपली.

ग्रामसभेत मालमत्ता कर व पाणीपट्टी वाढीचा ठराव मंजूर करण्यात आला. ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांचा पारा चढला. अनेक ग्रामस्थ सभेला येणार होते. परंतु ते येण्यापूर्वीच सभा आटोपण्यात आली. त्यामुळं संतापलेल्या ग्रामस्थांनी सदस्यांना कार्यालयात कोंडले व कुलूप लावले. पोलिसांच्या मध्यस्थीनं सर्वांची सुटका झाली. आता 4 डिसेंबला पुन्हा देवपायलीत ग्रामसभा घेण्यात येणार आहे. देवपायलीत घडलेल्या या प्रकारनं जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरपंचांच्या परवागनीनं पाणीपट्टी व मालमत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय नियमानुसार आहे, असं ग्रामसेवक प्रशांत दोडके म्हणाले. आम्हाला विश्वासात न घेता मनमानी पद्धतीनं करवाढ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ वामन मडावी यांनी केला.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितलं की, आम्ही ग्रामस्थांची समजूत काढली. त्यामुळे त्यांनी सर्वाना मुक्त केले. याप्रकरणी कुणीही तक्रार न दिल्यानं कारवाई करण्यात आली नाही. पुढील ग्रामसभा 4 डिसेंबरला होणार आहे. आता गावात शांतता आहे. गावातील वाद निवळल्यानंतर पोलिस माघारी परतले आहेत. ग्रामपंचायतीनं मागणी केल्यास देवपायलीत सभेच्या दिवशी बंदोबस्त तैनात करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !