चनकाई नगरातील अवैध दारू व गांजा विक्री बंद करा ,उपोषण कर्त्याची मागणी
गडचिरोली: शहरातील चनकाई नगरात काही महिला व पुरुषांची टोळी
गांजा व दारूची राजरोस विक्री करते. पोलिसांचे संबंधितांना अभय असल्याचा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी २४ ऑगस्टला या भागातील एका नागरिकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
चनकाई नगरात मागील दीड वर्षापासून दारू व गांजाचा गोरखधंदा राजरोस सुरू असल्याचा नारायण मुनघाटे यांचा आरोप आहे. यासंदर्भात पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार करूनही अवैध धंदेवाल्यांवर कारवाया केल्या जात नाहीत, असा त्यांचा दावा
आहे. यासंदर्भात कोणी आवाज उठवला तर धमकावणे, दाबदडप करणे असे प्रकार केले जातात, शिवाय महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे मुनघाटे यांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी कारवाईस चालढकल केल्याने त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. २४ ऑगस्टला त्यांनीउपोषण सुरू केले. विशेष म्हणजे निवेदनात त्यांनी अवैध धंद्यांमध्ये कोण सामील असलेल्यांची नावेही दिली असून, कारवाई होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा इशारा दिला. पो. नि...अरविंदकुमार कतलाम यांना संपर्क केला असता त्यांनी कॉल घेतला नाही.त्यामुळे त्यांची बाजू कळाली नाही.
दुचाकीवरून पार्सलसेवा
" दरम्यान, अवैध धंदेवाले मोटरसायकलवरून ग्राहकांना दारू, गांजा पुरवतात, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. यातील आरोपींना तडीपार करावे,अशी मागणी नारायण मुनघाटे यांनी केली आहे..

