आम्ही सर्वजण भाऊ भाऊ मिळून पैसे खाऊ म्हणत सरपंच, उपसरपंच व दोन सदस्य सापडले लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
वैनगंगा वार्ता १९
गोंदिया : -
बांधकाम साहित्याचा धनादेश देण्यासाठी ७० हजार रुपयांची मागणी करणारे सरपंच, उपसरपंच व दोन सदस्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे शुक्रवारी (दि. १८) ही कारवाई करण्यात आली आहे. यातील तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
तक्रारदार रा. देवरी हे बांधकाम साहित्य पुरवठाधारक असून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामपंचायत वडेगाव येथे सन २०२०-२१ मध्ये ग्रामपंचायत निविदेनुसार विविध कामांकरिता बांधकाम साहित्य पुरवठा केला होता. तक्रारदार यांना पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याच्या मंजूर बिलाचा धनादेश देण्यासाठी सरपंच रिना हेमंत तरोणे (३२). उपसरपंच दिनेश सुनील मुनीश्वर (२७), ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मंसाराम मेंढे (३८) व ग्रामपंचायत सदस्य लोपा विजय गजभिये (५०, सर्व रा. वडेगाव, सडक-
अर्जुनी) यांनी पाच टक्केप्रमाणे ७५ हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने १० ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक विलास काळे, पो.नि. उमाकांत उगले, अतुल तवाडे, हवालदार संजय बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, संगीता पटले व दीपक बाटबर्वे यांनी केली आहे.
तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधककडून पडताळणी करण्यात आली असता तडजोडीअंती ७० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, संशय आल्याने चौघांनी पैसे घेण्यास टाळाटाळ केली. अखेर शुक्रवारी (दि. १८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याप्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून सरपंच रिना तरोणे, उपसरपंच दिनेश मुनीश्वर व ग्रा.पं. सदस्य मार्तंड मेंढे यांना अटक केली.

