सुरगाव येथील पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे
समस्याचे निराकरण न केल्यास नगराध्यक्षा सह सर्व पदाधिकारी उपोषणास्त्र हत्यार उपसण्याचा दिला इशारा
अशोक खंडारे मुख्य संपादक
गोंडपिपरी:-
तालुक्यातील सुरगाव येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागा अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होऊन आज तारखेला पूर्णत्वास आले खरे परंतु या कामात कुठल्याही प्रकारचा नियोजन नसल्याने कामात अनेक तृट्या असल्याचे बोलले जात आहे. शहरात पाईप लाईनची कामे करत असताना नवीन पाईप टाकण्यात आलेले नाही.जुनेच पाईपच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू असल्याने शहरात पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाताहत होत आहे.कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून राबविण्यात आलेली पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.
सुरगाव येथे जीवन प्राधिकरण विभागा अंतर्गत १० कोटी निधी खर्च करून राबविण्यात आलेली पाणी पुरवठा योजना गोंडपिपरी नगर पंचायतीच्या अखत्यारीत येते. या योजनेकडे जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकारी वर्गाने डोळेझाक केल्यामुळे संबंधित ठेकेदाराने संपूर्ण कामात चालढकल करून कामे केली आहे. यावर संबंधित खात्याचा अंकुश नसल्याने निकृष्ट दर्जाची कामे करून ठेकेदारांनी आपले रान मोकळे केले आहे.कामे पुर्णत्वास येऊन देखील नागरिकांना शुद्ध आणि व्यवस्थित पाणी मिळणे अवघड जात आहे.करोडो रुपये खर्चून सुद्धा नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासाठी नगर पंचायतच्या अध्यक्षांनी जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.
या पाणी पुरवठ्याचे काम पूर्णत्वास आले आहे.परंतु कामात झालेल्या गैरप्रकारामुळे शहरात अनेक समस्या उद्भवत आहेत. अनेक प्रभागात नवीन पाईप लाईन टाकण्यात आले नसुन,जुन्याच पाईप लाईनमधुन नागरिकांना नळ जोडणी देण्यात आले असल्याचे दिसून आले.त्यामुळे संपूर्ण प्रभागात दुषित पाणी पुरवठा होत असल्याची शहरवासीयांची तक्रार आहे.लिकेज असलेले नळ जैसे थे असुन वाढीव नळ जोडणीची कामे अद्यापही पुर्ण झालेली नाही.निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अनेक समस्या प्रलंबित असुन त्या समस्याचे १५ दिवसात निराकरण करण्यात यावे अन्यथा जीवन प्राधिकरण विभागाच्या विरोधात बेमुद्दत आमरण उपोषण करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा नगर अध्यक्षा सविता कुळमेथे यांच्या नेतृत्वात समस्त नगर सेवकांनी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

