जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापूर चा उपक्रम
प्रतिनिधी / चामोर्शी : तहसील कार्यालय चामोर्शी तथा तालुका प्रशासनाच्या वतीने शासकीय योजनांची जत्रा शिबिराचे आयोजन राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथील पटांगणात येथे २६ मे रोजी करण्यात आले होते. या शिबिरात जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापूर द्वारा संचालित जिल्हा रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियाना अंतर्गत रक्तदान विषय जनजागृतीचे स्टॉल लावून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे याकरिता जनजागृती करण्यात आली.
जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापूर द्वारा संचालित जिल्हा रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियाना अंतर्गत रक्तदान विषय जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आष्टी येथील स्टॉलला अनेक नागरिकांनी भेट देऊन रक्तदानाचे महत्व जाणून घेतले. स्टॉलला आमदार डॉ. देवराव होळी, उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी सागर पाटील, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, आष्टीच्या सरपंच बेबीताई बुरांडे, येणापूरचे मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे, आष्टीचे मंडळ अधिकारी विनोद ढोरे, व आदी मान्यवरांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी अनेकांनी आपण स्वतःहून रक्तदान करणार असा संकल्प संस्थेच्या पदाधिकाऱ्यांजवळ बोलून दाखविला. रक्तदान करिता सर्वांनी पुढाकार घेवून रक्तदान चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.
शिबिराप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष तथा रक्तदाता शोधमोहीम अभियानाच्या संचालिका सुनीताताई बंडावार, यांच्या मार्गदर्शनात व सचिव वसंत बुरनवार यांच्या उपस्थितीत फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी महेश हर्षे, अर्चना मेकलवार, रोशन वाकुडकर यांनी नागरिकांना माहिती दिली.

