३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल जिल्हा सामान्य रुग्णालयाचे पथकाची मोहीम
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक
आरमोरी:
कायद्याचे उल्लंघन करून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या आरमोरी येथील १२ पानठेलेधारकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूने १० मे रोजी कारवाई केली. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कोटपा कायदा भरारी पथकाकडून आरमोरी येथील बसस्थानक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय आरमोरी व शाळा महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानठेलाधारकावर कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाहीची माहिती शहरातील पानठेलाधारकांना मिळताच बरेच पानठेला धारक कारवाईच्या भीतीने आपली दुकाने बंद करून पसार झाले, कोटपा कायद्यानुसार कलम ४, कलम ६ अ व ६ ब अंतर्गत दंडात्मक कारवाई करून १२ पानठेलाधारकांकडून ३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या मार्गदर्शनात एनसीडींच्या प्रभारी जिल्हा सल्लागार डॉ. स्वाती साठे, पर्यवेक्षक राहुल कंकलवार, सामाजिक कार्यकर्ती मीना दिवटे, आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक किरण दहीकर, पोलिस नाईक वशिम पठाण यांनी केली.
मुलांना तंबाखूपासून ठेवा दूर
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ मानवी आरोग्यास घातक आहेत. अल्पवयीन मुलांमध्ये तंबाखू व खर्रा खाण्याचे प्रमाण बयाच प्रमाणात वाढत आहे. अल्पवयीन मुलांमध्ये पूर्व कर्करोग लक्षणे आढळून आली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना तंबाखूजन्य पदार्थापासून दूर ठेवावे, असे आवाहन एनसीडी विभागाने केले.