आष्टीतील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाचा स्वतंत्र आदेश काढण्याची शिवसेनेची मागणी

0
आष्टीतील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाचा स्वतंत्र आदेश काढण्याची शिवसेनेची मागणी 


गडचिरोली (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टीत अप्पर तहसील कार्यालय यापूर्वी मंजूर झाले होते असा दावा करीत शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत स्वतंत्र शासन आदेश निर्गमित करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली. जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबतचे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने शासनाने प्रशासकीय व्याप, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, नागरीकरण तसेच नागरिकांना शासकीय सेवा सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी प्रशासकीय कार्यालयांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. मात्र, ही अप्पर तहसील कार्यालये कार्यान्वित करण्याबाबत शासनाकडून निर्गमित आदेशामध्ये आष्टी येथील अप्पर तहसील कार्यालयाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे आष्टी व परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि तीव्र नाराजी पसरली आहे.
आष्टी हे चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक व प्रशासकीय केंद्र आहे. परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी चामोर्शी तालुका मुख्यालयात जावे लागते. आष्टी परिसरातील गावांचे चामोर्शीपासूनचे अंतर ४५ ते ५० किलोमीटर इतके आहे. भौगोलिक परिस्थिती, वाढती लोकसंख्या, नागरीकरण तसेच नागरिकांची प्रशासकीय गरज लक्षात घेता आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालयाची नितांत आवश्यकता आहे.

गडचिरोली जिल्ह्यात प्रशासकीय पुनर्रचनेच्या प्रक्रियेदरम्यान आष्टी परिसराला स्वतंत्र प्रशासकीय दर्जा मिळावा, अशी नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे. आष्टी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्याची चर्चा सुरू झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नव्या शासन आदेशात आष्टीचा उल्लेख नसल्याने मंजुरीबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. मंजूर कार्यालयाची अंमलबजावणी कोणत्याही प्रशासकीय अथवा राजकीय कारणामुळे प्रलंबित राहू नये, अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

अप्पर तहसील कार्यालयाबाबत स्वतंत्र व स्पष्ट शासन आदेश तातडीने निर्गमित करून आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करावी, अन्यथा आष्टी परिसरातील नागरिकांकडून मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पाठविण्यात आली आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !