ब्रेकिंग न्युज
अहेरी येथील भाजपचा स्वीकृत नगरसेवक ACB च्या जाळ्यात
गडचिरोली - अहेरी: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या विद्युत कामाच्या कंत्राटापोटी १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना भाजपचे स्वीकृत नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांना गोंदिया व गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले.
गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास अहेरीच्या मुख्य बाजारपेठेत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
अमोल गुडेल्लीवार हे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात विविध विद्युत कामे प्रस्तावित होती. एका कंत्राटदाराने नगरपंचायतीअंतर्गत विद्युत कामांचे कंत्राट घेतले होते. या कामांच्या मोबदल्यात गुडेल्लीवार यांनी कंत्राटदाराकडे १ लाख २० हजार रुपयांची कमिशनच्या स्वरूपात मागणी केली होती.
लाच देण्याची इच्छा नसलेल्या कंत्राटदाराने गोंदिया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत ACB च्या पथकाने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यात मागणीची पुष्टी झाल्यानंतर सापळा रचण्यात आला.
ठरल्याप्रमाणे कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना गुडेल्लीवार यांना ACB च्या पथकाने ताब्यात घेतले.
कोणत्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई?
या कारवाईत गोंदिया ACB चे उपअधीक्षक नीलेश लोधी यांच्या पथकासह गडचिरोली ACB चे उपअधीक्षक विक्रांत सगणे यांच्या पथकाने सहभाग घेतला. या प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर मिळाले होते पद
नगरपंचायत निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भाजपने गुडेल्लीवार यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती. मात्र, आता लाचखोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर ACB ने कारवाई केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

