धम्म क्रांतीने दलितांना नावे बळ मिळाले - प्रा. डॉ. मनोहर नाईक
गडचिरोली --लोकसमूहाला न्याय मिळवून देणारे जगातील कोणतेही लढे हे रक्तपाता शिवाय झाले नाहीत. बाबासाहेबांनी मात्र रक्ताचा एकही थेंब न सांडवता अहिंसेच्या मार्गाने धम्मक्रांती घडवून आणली आणि या क्रांतीने दलितांना नावे बळ मिळाले असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. मनोहर नाईक यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने केले.
गोकुळ नगर येथील सम्यक बुद्ध विहाराचे प्रांगणात सम्यक समाज समिती आणि विशाखा महिला मंडळाचे वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
समितीचे अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रसिद्ध वक्ते प्रसेन्जीत गायकवाड ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रोहिदास राऊत, ज्येष्ठ फिजिसियन डॉ. इंद्रजीत नागदेवते, कवडूजी उंदीरवाडे, महिला मंडळाच्या मनीषा वाळके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. नाईक पुढे म्हणाले बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा धम्म हा केवळ आपण बुद्धिस्ट लोकांसाठीच नाही तर देशातील आणि जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. ज्यांनी याचा स्वीकार केला त्यांचे जीवनात अमुलाग्र बदल घडले आहेत. म्हणून आपण स्वीकारलेल्या बुद्धाच्या धम्माचे काटेकोर पालन करूया आणि इतरांनाही धम्म सांगून धम्माच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न करूया.
गायकवाड म्हणाले बुध्द हे जगातील सर्वात मोठे व्यवहारी होते. त्यांनी माणूस म्हणून परस्पर व्यवहार कसा करायचा हे जगाला शिकविले. बुध्दाने शील, करुणा,मैत्री,प्रेम, शिक्षविले.वैज्ञानिक कसोटीवर त्यांचा धम्म उभा होता. आर्य अष्टांगिक मार्गाच्या पालनाने आपण आणि संपूर्ण समाज सुखी होऊ शकतो.
रोहिदास राऊत यांनी संविधानातील समता बंधुता न्याय हि तत्वे बुद्ध धम्माने प्रेरित असून आज संपूर्ण मानव जातीला ती गरजेचे आहेतच पण आपल्याला आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन गौतम मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप भैसारे यांनी केले. बौद्ध बांधव व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

