शारदोत्सवानिमित्त श्रमदानातून ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ अभियान

0
शारदोत्सवानिमित्त श्रमदानातून ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ अभियान

छत्रपती शिवाजी महाराज महिला मंडळ, मोहुर्लीचा स्तुत्य उपक्रम


वैनगंगा वार्ता १९
चामोर्शी :-
शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व आकर्षक असावा तसेच विद्यार्थ्यांना आनंददायी आणि प्रसन्न शैक्षणिक वातावरण मिळावे, या उद्देशाने शारदोत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महिला मंडळ, मोहुर्ली यांच्या वतीने जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मोहुर्ली येथे श्रमदानातून ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात महिला मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शाळेचा परिसर स्वच्छ केला. परिसराची साफसफाई, परिपाठ व भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेची स्वच्छता करून सारवण करणे, तसेच परसबागेतील अनावश्यक गवत व तण काढणे आदी कामे श्रमदानातून करण्यात आली. त्यानंतर शाळेचा परिसर स्वच्छ, टापटीप व आकर्षक करून विविध ठिकाणी सुबक सजावट करण्यात आली.

महिला मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या श्रमदानामुळे शाळेच्या परिसराला स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही स्वच्छतेविषयी आवड, जाणीव आणि जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. तसेच ‘स्वच्छ शाळा–सुंदर शाळा’ हा संदेश अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

शाळेच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महिला मंडळ, मोहुर्ली यांच्या सर्व सदस्यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

“श्रमदानातून स्वच्छता, स्वच्छतेतून सुंदरता आणि सुंदरतेतून आनंददायी शिक्षण!”
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !