६० वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यूच्या गुढाचा पोलिसांनी लावला छडा
पूर्ववैमनस्यातून काठीने मारहाण करून खाडीत नेल्याचा पोलिसांचा तपासात निष्कर्ष; संदीप टेकाम अटकेत
आष्टी (अशोक खंडारे):- चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर येथील ६० वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अखेर उकलण्यात चामोर्शी पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती तसेच मृतदेहावरील जखमांचे बारकाईने केलेले निरीक्षण यांच्या आधारे पोलिसांनी संदीप रावजी टेकाम (वय ३३, रा. नारायणपूर चक क्रमांक २, ता. चामोर्शी) याला अटक केली आहे. पूर्ववैमनस्य आणि जुन्या वादातून गोपिकाबाई रामभाऊ गायकवाड यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी मौजा नारायणपूर, चक क्रमांक २ येथील गोपिकाबाई रामभाऊ गायकवाड या शेतात गेल्या होत्या. मात्र, त्या नेहमीप्रमाणे घरी परत न आल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान त्यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४६०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अज्ञात असल्याने पोलिसांसमोर या गंभीर व क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान होते.
जखमांच्या निरीक्षणातून तपासाला मिळाली नवी दिशा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची पाहणी केली. त्यानंतर तांत्रिक पुरावे, कौटुंबिक संबंध, गोपनीय माहिती आणि घटनाक्रमाच्या विविध बाजू तपासण्यात आल्या.
तपासादरम्यान मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. जखमांच्या स्वरूपावरून आरोपी डावखुरा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या निरीक्षणामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर तपास पथकाने संशयितांच्या हालचाली, तांत्रिक माहिती आणि उपलब्ध गोपनीय माहितीच्या आधारे संदीप टेकाम याच्यावर संशय घेतला. त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.
पूर्ववैमनस्यातून खून केल्याचा पोलिसांचा निष्कर्ष
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्य आणि जुन्या वादातून गोपिकाबाई गायकवाड यांच्यावर काट्याने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना खाडीत नेऊन खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात संशयित संदीप रावजी टेकाम याला पोलिसांनी अटक केली असून त्याला प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
दरम्यान, खुनामागील नेमके कारण, घटनाक्रम आणि या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.
तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीचा प्रभावी वापर
या क्लिष्ट गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी तांत्रिक पुरावे, गोपनीय माहिती तसेच घटनास्थळावरील आणि मृतदेहावरील उपलब्ध बाबींचा बारकाईने अभ्यास केला. आरोपी निष्पन्न करून त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याने या तपासाची विशेष चर्चा होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. गोकुळ राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फगरे, संबंधित अधिकारी-अंमलदार तसेच पोमेंक घोट येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
गंभीर व क्लिष्ट स्वरूपाच्या या खुनाचा तपास यशस्वीपणे पुढे नेल्याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.

