आष्टी येथील आंबेडकर चौकातील अतिक्रमण हटविणार तरी कोण?
गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री जयस्वाल यांच्या पत्राला केराची टोपली!
आष्टी (अशोक खंडारे ) :- जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथील आंबेडकर चौकातील वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. १५ ते २० वर्षांपूर्वी खुटेमाटे यांच्या हॉटेल ला लागून चमोर्शी आलापल्ली मार्गावरील वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने सौंदर्यीकरण केले होते. त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आले होते. त्या सौंदर्यीकरणाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते .मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले सौंदर्यीकरण गडप झाले असून आतापर्यंत दिसत असलेले लोखंडी ग्रील सुद्धा गायब झाले आहे. आणि त्याठिकाणी आता चहाटपरी , हॉटेल , फळविक्रते , पानठेले , मंचेरियल विक्रेते , पाणीपुरी , नूडल्स यांनी आता ती जागा घेतली आहे.आणि हळूहळू अतिक्रमणाने आंबेडकर चौकातील चारही मार्गावर कब्जा केलेला आहे. रस्त्याच्या बाजूला सर्वत्र दुकाने थाटलेली आहे. रस्त्यावरुन जातांना नागरिकांना जपून चालावे लागत आहे. त्यातच रहदारी वाढल्याने आष्टी येथे अत्याधुनिक वाहतूक सिग्नल लावण्यात आले आहे , काही दिवसांपूर्वी ते सुरु करण्यात आले. मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या चौकातील रस्ते लहान झाले त्यामुळे सिग्नल लावूनही वाहतुकीची समस्या सुटलेली नाही .त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
गडचिरोली येथे झालेल्या डीपिडीसी मध्ये सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना आष्टी येथील आंबेडकर चौकातील अतिक्रमण काढण्याबाबत सूचना केल्या होत्या. परंतू त्यांच्या पत्रास केराची टोपली दाखवली आहे तरीही हे अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही.
यातच सुरजागड येथील लोह खनिज घेऊन जाणारे अवजड ट्रक दिवसरात्र सुरु असतात. त्यामुळे वाहतूक फार वाढली आहे.
२२ जूनला नागपूर -एटापल्ली या एस टी बसला ७.३० वाजता बोअरवेल ची ट्रकने धडक दिली सुदैवाने जीवितहानी टळली. ही दोन्ही वाहने आंबेडकर चौकातून जात होती.
आष्टी -आलापल्ली या मागचे रुंदीकरण न झाल्याने एकेरी मार्ग नाही. या मार्गावर वाहतूक सिग्नल लावले त्या ठिकाणी फळांचे , चहा टपरी , हॉटेल आहे . नागरीक सिग्नल जवळ किंवा रस्त्यावर वाहने उभी करतात .त्यामुळे सिग्नल लागल्यावर वाहने उभी राहायला जागा नसते. सिग्नल सुरु झाल्यावर वाहन चालकांना वाहने काढतांना कसरत करावी लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
आष्टी येथील ग्रामपंचायत ने सुद्धा दोन वर्षांपूर्वी सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती असे सरपंच तथा प्रशासक बेबीताई बुरांडे यांनी सांगितले आहे
तेव्हा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सहपालकमंत्र्यांच्या सूचनेकडे लक्ष देऊन तत्काळ आंबेडकर चौकातील अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरणाचे व ज्या ठिकाणी पुर्वी नाली बांधकाम करण्यात आले होते त्याच ठिकाणाहून नवीन नाली बांधकाम करण्यात यावे अशी मागणी आष्टी परिसरातील गरिकांनी केलेली आहे.


