कोलपल्लीत पोलीसांनी टाकलेल्या धाडीत तीन लाख बावन्न हजार रुपयांचा दारुसाठा जप्त

0

कोलपल्लीत पोलीसांनी टाकलेल्या धाडीत तीन लाख बावन्न हजार रुपयांचा दारुसाठा जप्त


अहेरी पोलीसांनी दोघांविरुद्ध केला गुन्हा दाखल


 अहेरी (अशोक खंडारे):- अहेरी तालुक्यातील कोलपल्ली येथे विक्रीच्या उद्देशाने घरात साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील देशी-विदेशी दारूसाठा अहेरी पोलिसांनी जप्त केला. १८ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत ३ लाख ५२ हजार रुपये किमतीचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलपल्ली परिसरात अवैधरीत्या दारूचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने १८ सप्टेंबर रोजी कोलपल्ली येथील संशयितांच्या राहत्या घराची पाहणी केली. यावेळी घरातील पहिल्या खोलीत पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी तत्काळ हा साठा ताब्यात घेत घटनास्थळी पंचनामा केला. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या देशी-विदेशी दारूसाठ्चाची एकूण किंमत ३ लाख ५२ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित दारूसाठा कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकरणी दिवाकर बाना गावडे ४२ वर्ष आणि संपत पोचा आईलवार ४२ वर्ष, दोघेही रा. कोलपल्ली, यांच्याविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जप्त करण्यात आलेला दारूसाठा नेमका कोठून आणण्यात आला होता, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या साठ्याची पुढे कोणत्या परिसरात विक्री केली जाणार होती, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कारवाईतून अवैध दारूविक्रीच्या साखळीतील अन्य व्यक्तींची नावे समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अहेरी तालुक्यात अवैध दारूविक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू असून, कोलपल्लीतील या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून गस्त व तपासणी वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !