राधिका मगरे, निधी जांभुळकर यांची बॉल बॅडमिंटन, तर परिणीता मुजुमदारची सॉफ्टबॉल महाराष्ट्र संघात निवड

0

राधिका मगरे, निधी जांभुळकर यांची बॉल बॅडमिंटन, तर परिणीता मुजुमदारची सॉफ्टबॉल महाराष्ट्र संघात निवड

गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


वैनगंगा वार्ता १९

 गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय

पातळीवर आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली आहे. गडचिरोली जिल्हा बॉल बॅडमिंटन संघटनेच्या खेळाडू कुमारी राधिका मगरे आणि कुमारी निधी जांभुळकर यांची बॉल बॅडमिंटनच्या महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तसेच कुमारी परिणीता मुजुमदार हिची सॉफ्टबॉलच्या महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. या तिन्ही खेळाडूंच्या निवडीमुळे गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुमारी राधिका मगरे हिची तिरुपती, आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या ७२ व्या राष्ट्रीय वरिष्ठ बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी तसेच भिलाई, छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. राधिकाने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करत आपली निवड निश्चित केली.

त्याचप्रमाणे कुमारी निधी जांभुळकर हिचीही राष्ट्रीय सब-ज्युनिअर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात

निवड झाली आहे. नुकत्याच बेलापूर, अहिल्यानगर येथे झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत तसेच १० ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान चंद्रपूर येथे झालेल्या सब-ज्युनिअर बॉल बॅडमिंटन स्पर्धेत राधिका मगरे आणि निधी जांभुळकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे त्यांची महाराष्ट्र संघासाठी निवड करण्यात आली.

परिणीता मुजुमदारची सॉफ्टबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर झेप -

दरम्यान, कुमारी परिणीता मुजुमदार हिनेही सॉफ्टबॉलमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघात स्थान मिळविले आहे. १९ ते २२ सप्टेंबर २०२६ दरम्यान फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ३२ व्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेत परिणीताने उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेतील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तिची छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ३९ व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने परिणीताच्या या निवडीचे क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत आहे.

मान्यवरांकडून अभिनंदन -

राधिका मगरे, निधी जांभुळकर आणि परिणीता मुजुमदार यांच्या उल्लेखनीय निवडीबद्दल गडचिरोली जिल्हा बॉल बॅडमिंटन व सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश संग्रामे, सचिव प्रा. ऋषिकांत पापडकर, मार्गदर्शक प्रा. रूपाली पापडकर, प्रशिक्षक शेषराज खेडकर, प्रसाद ताजणे, आशिष निजाम, प्रवीण पोयम आणि स्वप्निल मडावी यांनी अभिनंदन केले आहे.

या तिन्ही खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर मजल मारल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे. त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागामुळे जिल्ह्यातील इतर होतकरू खेळाडूंनाही प्रेरणा मिळणार असून, गडचिरोलीतील बॉल बॅडमिंटन आणि सॉफ्टबॉल खेळाला अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !