आष्टी पोलिसांचा कान्हाळगाव जंगलात छापा; दारुसह ४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
 आष्टी पोलिसांचा कान्हाळगाव जंगलात छापा; दारुसह ४.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त


आष्टी (अशोक खंडारे): मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी मौजा कान्हाळगाव जंगल परिसरातील नाल्याजवळ दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. यावेळी काही इसम लाकडाची चूल पेटवून हातभट्टी पद्धतीने गुडामोहाचा सडवा तयार करून दारू गाळताना आढळून आले.

पोलिस व पंचांची चाहूल लागताच संबंधित इसमांनी जंगलातील दाट झाडीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी जमिनीत खड्डा करून लपवून ठेवलेले २२ बॅरल गुडामोहाचा सडवा तसेच हातभट्टी दारू तयार करण्यासाठीचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत ४ लाख ५६ हजार रुपये आहे.

घटनास्थळावरून पसार झालेल्या इसमांची ओळख पंच तसेच परिसरात शेळ्या व गुरे चारणाऱ्या व्यक्तींमार्फत पटविण्यात आल्याचे पोलिसांच्या हकीकतीत नमूद आहे. त्यानुसार दीपेश दीपक बारई (३२), अजय बिशवनाथ दास (३६), बिशजीत नारायण सरकार (३८) आणि रनजित सुनील सरकार (४३), सर्व रा. राममोहनपूर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी अपराध क्रमांक २८०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(क), ६५(ई), ६५(फ) व ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत फिर्यादी म्हणून अरुणकुमार उद्धव टेकाम (वय ४७), पोलीस हवालदार क्र. १९७२, पोलीस स्टेशन आष्टी यांनी तक्रार दिली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात पोहवा/३०५४ शंकर सिडाम करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !