जन्मदात्याला मुलाने काठीने मारुन पाठविले यमसदनी
सावली तालुक्यातील चिचबोडी येथील धक्कादायक घटना; मुलगा फरार, पोलिसांकडून शोध सुरू
सावली/प्रतिनिधी : जन्मदात्या सोबत जेवणाच्या कारणावरून लेकाने काठीने वार करून यमसदनी पाठवले सुरू असलेला वाद शनिवारी रात्री टोकाला गेला आणि काठीने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सावली तालुक्यातील चिचबोडी येथे घडली. मुखरू कवडू मलोडे (५५) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात त्यांचा मुलगा दिलीप मुखरू मलोडे (३०) याच्यावर मारहाणीचा आरोप असून, घटनेनंतर तो फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकरू मलोडे आणि दिलीप यांच्यात जेवणाच्या कारणावरून मागील काही दिवसांपासून वारंवार शाब्दिक वाद होत होते. शनिवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास पुन्हा याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर दिलीपने वडिलांना काठीने मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
या मारहाणीत मुकरू मलोडे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मुकरू मलोडे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, मारहाणीनंतर दिलीप मलोडे घटनास्थळावरून फरार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी सावली पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
घटनेमागील नेमके कारण, मारहाणीची परिस्थिती आणि मृत्यूचे वैद्यकीय कारण तपासातून स्पष्ट होणार आहे

