नगरी येथील परवानगी नसताना रेतीघाट कसा दिला? - ग्रामस्थांचा सवाल बेशरमची झाडे लावून प्रशासनाचा निषेध
गडचिरोली, प्रतिनिधी :-
गडचिरोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नगरी गावातील रेतीघाट आणि त्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रेतीघाटावरील अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यात बेशरमची झाडे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
विशेष म्हणजे, नगरी ग्रामपंचायतीने या रेतीघाटासाठी कोणतीही परवानगी दिलेली नसतानाही महसूल प्रशासनाने रेतीघाटाचा लिलाव कसा केला?, असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
अवजड वाहतुकीने रस्त्याची चाळण
नगरी येथील नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, वाहनचालक आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गालगत शेकडो एकर शेती असून, उभ्या पिकांना खत देण्यासाठी तसेच फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले आहे.
रेतीघाटामुळे होणारी अवजड वाहनांची वाहतूक आणि त्यातून निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
ग्रामसभेत ठराव; रस्ता काँक्रीट करण्याची मागणी
या प्रश्नाची गंभीर दखल घेत नगरी ग्रामपंचायतीच्या १७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत रीतसर ठराव मंजूर करण्यात आला. नदीघाटाकडे जाणारा खड्डेमय रस्ता तातडीने काँक्रीटचा करून देण्यात यावा, अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीसाठी प्रस्ताव
ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. जिल्हा वार्षिक ‘जनसुविधा योजना’ किंवा उपलब्ध अन्य निधीतून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
एका बाजूला ग्रामपंचायतीची परवानगी नसल्याचा दावा असताना रेतीघाटाचा लिलाव झाल्याचा आरोप आणि दुसऱ्या बाजूला रेती वाहतुकीमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था, या दोन्ही मुद्द्यांवर आता महसूल व जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांचा मोठा सहभाग
ग्रामपंचायतीच्या सरपंच भूमिला बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोरेश्वर बांबोळे, पोलीस पाटील नागेश्वरी तिवारी यांच्यासह चंदन वाघरे, अमन बांबोळे, सौरभ चरडूके, कल्पना मेश्राम, मनोहर कुंभारे, मृणाल कुंभारे, रणजित म्हशाखेत्री, लता भोयर, प्रियंका थोरात, वर्षा कोसमशील, आशा राऊत, सोनिया उईके, कविता उईके, ललिता मडावी, मनीषा उईके, मनिरो ओमत, गंगा छेत्री, मिलिंद म्हशाखेत्री यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.

