पुराच्या प्रवाहातून गर्भवती महिलेला बैलबंडीने नेण्याची आली वेळ, गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

0
पुराच्या प्रवाहातून गर्भवती महिलेला बैलबंडीने नेण्याची आली वेळ, गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव 



सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत गुमालकोंडा अंतर्गत गुमालकोंडा, मुत्तापूर, सोमनूर, मुकीडिगुत्ता, जुना सोमनूर आणि नवीन सोमनूर ही गावे मुसळधार पावसामुळे पूर्णपणे संपर्काबाहेर गेली आहेत. मुत्तापूर येथील पुलियावर नदीच्या पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते 
या गंभीर परिस्थितीमुळे रुग्णांना उपचारासाठी सिरोंचा उपजिल्हा रुग्णालयात जाता येत नाही. याच दरम्यान एका गर्भवती महिलेची प्रसूतीची वेळ आल्याने तिला रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. पुलिया पाण्याखाली असल्यामुळे ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून त्या डिलिव्हरी पेशंटला बैलबंडीच्या साहाय्याने सुरक्षित ठिकाणी नेले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील प्रशासनाच्या दुर्लक्षाचे गंभीर उदाहरण असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तसेच शासकीय कामकाज, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळेत जाणे, अत्यावश्यक सेवा, बाजारपेठ आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. एखादी आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांसमोर जीविताचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने मुत्तापूर येथे उंच पुलाचे बांधकाम करावे तसेच कायमस्वरूपी वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर मागणीसाठी देविदास लटकरी, इंद्रकुमार गोगुला, रमेश जंगम, हार्यंत कुमारी, श्रीनिवास जंगम, सडवली लटकरी, संजय गोगुला तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित पाहणी करून मुत्तापूर येथे उंच पूल व सर्व ऋतूंमध्ये सुरू राहील असा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !