आष्टीत शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलनाची पोलिसांचे ‘समजपत्र’ देत झाली सांगता

0

आष्टीत शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलनाची पोलिसांचे ‘समजपत्र’ देत झाली सांगता


विनापरवाना ड्रोनने जमीन मोजणीचा आरोप; सात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने संताप — रात्री ११ वाजता आंदोलन मागे





आष्टी (अशोक खंडारे):- येनापूर परिसरातील १३ गावांतील शेतकऱ्यांचा भूमी अधिग्रहणाच्या प्रश्नावरून सुरू असलेला संघर्ष शुक्रवारी आष्टीच्या रस्त्यावर उतरला. मुधोली चक नं. २ येथे ९ जुलै रोजी जमीन मोजणीसाठी विनापरवाना ड्रोनचा वापर केल्याचा आरोप करीत खाजगी कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अडविल्याप्रकरणी सात शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी दिनांक शुक्रवारी ७ ऑगस्ट रोजी आष्टी पोलीस ठाण्यावर धडक देत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. मात्र, तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चक्का जाम आंदोलन छेडले.
गुन्हे मागे घेतल्याशिवाय माघार नाही’

शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, या मागणीवर आंदोलक ठाम राहिले. चक्का जाममुळे चंद्रपूर–आलापल्ली–गडचिरोली मार्गावरील वाहतूक जवळपास आठ तास ठप्प झाली. प्रमुख चौकात वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
भूमी अधिग्रहणाचा प्रश्न आधीपासूनच धगधगत असताना शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आले. १३ गावांतील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत प्रशासनाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी केली.
पोलिसांचे ‘समजपत्र’; तपास बंद करण्याची नोंद
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या ‘समजपत्रात’ संबंधित प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वाची नोंद करण्यात आली आहे. पत्रानुसार, तक्रारदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान पुरावा मिळून न आल्याने आणि कायद्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पत्रावर तपासी अधिकारी मदन एम. मस्के, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आष्टी यांची स्वाक्षरी आहे. संबंधित शेतकऱ्यांना हे पत्र देण्यात आल्याने आंदोलनातील प्रमुख मागणीला दिलासा मिळाल्याचा दावा आंदोलकांकडून करण्यात आला.
रात्री झाली आंदोलनाची सांगता

दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या मागणीवर पोलिसांकडून पत्र देण्यात आले. त्यानंतर रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतले. त्यामुळे अखेर वाहतूक सुरळीत झाली.

९ जुलै रोजी मुधोली चक नं. २ येथे जमीन मोजणीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. संबंधित परवानगीबाबत आक्षेप घेत शेतकऱ्यांनी खाजगी कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना अडविले. या घटनेनंतर सात शेतकऱ्यांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याच कारवाईच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी प्रथम पोलीस ठाणे गाठले आणि नंतर चक्का जाम आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनाचा इशारा कायम

गुन्ह्याच्या प्रकरणावर पोलिसांनी तपास बंद करण्याबाबतचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी भूमी अधिग्रहणाच्या मूळ प्रश्नावर शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. येनापूर परिसरातील १३ गावांच्या शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !