आष्टी- इल्लूर जि. प. क्षेत्रातील दोन महिला प्रशासक (सरपंच) यांचा भाजपा पक्षप्रवेश
आष्टी, दि. १ ऑगस्ट (अशोक खंडारे): गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी - इल्लूर जि.प क्षेत्रातील दोन प्रशासक (सरपंच) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तत्पुर्वी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर करीता रुग्णालय परिसरात जागेची पाहणी करण्यात आली त्यानंतर चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत आष्टी परिसरातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच स्थानिक प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. तसेच बूथ सशक्तीकरण, पक्ष संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे आणि आगामी काळातील पक्षाच्या जनसंपर्क अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख विचारसरणीवर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ग्रामपंचायत आष्टीच्या सरपंच सौ. बेबीताई बुरांडे तसेच ग्रामपंचायत मार्कंडा (कं.)च्या सरपंच सौ. वनश्रीताई चापले यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दोन्ही महिला सरपंचांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या प्रवेशामुळे आष्टी परिसरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळेल तसेच विकास आणि जनसेवेची वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, माजी जि. प. सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधूकर भांडेकर, अविनाश विश्रोजवार, महामंत्री पवन रामगिरकार, नरेश असलावार अनंत प्रधान, रवी आलचेटीवार, देवा बोरकुटे, संदीप तिवाडे, विनोद भोयर राजनाथ कुशवाह यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते

