जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार येणापूर – जैरामपूर मार्गावरील वाहतूक चार दिवसाकरीता प्रतिबंधित
गडचिरोली, दि. ९ : पोलीस स्टेशन आष्टी हद्दी अंतर्गत मौजा कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचा लोह प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पासाठी मौजा मुधोली चक नं. २, पारडी देव (रिठ) व जैरामपूर येथील खाजगी तसेच शासकीय जमिनीचे मोजमाप व भूसंपादन प्रक्रिया दिनांक ११ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे.
सदर भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने, निदर्शने किंवा विरोध प्रदर्शन होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून येनापूर ते जैरामपूर मार्गावरील वाहतूक दिनांक १० मार्च २०२६ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत तात्पुरती बंद करण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला आहे.
यानुसार येनापूर ते जैरामपूर या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक प्रतिबंधित राहील. मात्र प्रवासी बसेस तसेच पाणी पुरवठा, महावितरण, दूरसंचार व रस्ते दुरुस्ती संदर्भातील अत्यावश्यक सेवा वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
सदर आदेश मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११६ अन्वये जारी करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना देण्यात आले आहेत.

