तीन दिवसांपासून सुरु नक्षल चकमकीत सात नक्षली ठार तर एक जवान शहीद

0
 तीन दिवसांपासून सुरु नक्षल चकमकीत सात नक्षली ठार तर एक जवान शहीद 


गडचिरोली : 
छत्तीसगड राज्य व भामरागड
तालुक्यातील सीमावर्ती भाग असलेल्या फोदेवाडा गावानजीकच्या जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये तीन दिवसांपासून सुरु असलेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. यात नक्षल्यांचा विभागीय समिती सदस्य तथा कंपनी क्रमांक १० चा कमांडर प्रभाकर हा ठार झाला आहे. या चकमकीत दीपक मडावी हा जवान शहीद झाला असून, जोगा मडावी हा जवान जखमी झाला आहे.

३ फेब्रुवारीला संध्याकाळपासून सी-६० पथक, केंद्रीय राखीव दल व जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर दोन दिवस अधूनमधून नक्षल्यांशी चकमक उडाली. आतापर्यंत पोलिसांनी घटनास्थळावरुन ७ नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यात ४ पुरुष व ३ महिला नक्षलींचा समावेश आहे. मृत नक्षल्यांमध्ये कंपनी क्रमांक १०, विभागीय समिती व पश्चिम सबझोनल कमिटीचा प्रभारी प्रभाकर याचाही खात्मा झाला आहे. प्रभाकर हा वरिष्ठ नक्षली असून, तो तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथील रहिवासी होता.
त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिसांनी ३ एके ४७ एक एसएलआर रायफल व एक ३०३ बंदूक जप्त केली आहे. अन्य नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
या चकमकीत गंभीर जखमी झालेला सी-६० पथकाचा जवान दीपक चिन्ना मडावी (३८) मूळ गाव मांड्रा (दामरंचा), ता.अहेरी यास आज पहाटे हेलिकॉप्टरने भामरागड येथे आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. जोगा मडावी, रा. किष्टय्यापल्ली हा जवान गोळी लागल्याने जखमी झाला. त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गडचिरोलीत शासकीय मानवंदना

शहीद जवान दीपक मडावी यांचे पार्थिव आज दुपारी हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पोलिस मुख्यालयाच्या पटागंणावर पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून दीपक यांना मानवंदना दिली. याप्रसंगी नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, केंद्रीय राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे यांनी दीपक यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !