गिताली येथील अवैध दारूची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला
अहेरी ( गडचिरोली)
गडचिरोली जिल्हा 'दारूबंदी' जिल्हा म्हणून ओळखला जात असतानाही, अवैध दारू विक्रेत्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मूलचेरा तालुक्यातील लगाम जवळील गिताली येथे अवैध दारूची तक्रार केल्याच्या रागातून, गावातील सहा तरुणांनी तंटामुक्ती समितीच्या सदस्यासह त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात सदस्याचे धाकटे बंधू गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गिताली येथील तंटामुक्ती समितीचे सदस्य श्री. कमलेश गणेश राय (वय ३८) यांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील अवैध दारू विक्री विरोधात आवाज उठवला होता. त्यांनी काही दिवसांपूर्वी अवैध दारू पकडून देण्यास मदत केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून गावातील सहा तरुणांनी शनिवार (7 फेब्रुवारी) कमलेश राय यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.व त्यांच्या कडे असलेल्या चार चाकी वाहनाची तोडफोड करीत असताना व
हा वाद सोडवण्यासाठी आणि आपल्या भावाचा बचाव करण्यासाठी कमलेश यांचे धाकटे बंधू श्री. समरेश गणेश राय (वय ३३) मध्ये पडले असता, नराधम तरुणांनी त्यांच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. या मारहाणीत समरेश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेनंतर जखमी समरेश राय यांना तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने आणि जखम खोल असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना दि 8 फेब्रूवारी ला तात्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेमुळे गिताली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अशा प्रकारे कायद्याची पायमल्ली करून तंटामुक्ती सदस्यावर हल्ला होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे.
"प्रशासनाने अशा बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना जर संरक्षण मिळणार नसेल, तर अवैध धंदे मोडीत कसे निघणार?" असा सवाल पीडित कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास अहेरी पोलीस स्टेशन द्वारे केला जात आहे.

