धान मळणी यंत्रात अडकून निलंबित वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

0
धान मळणी यंत्रात अडकून निलंबित वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू


लाकूड तस्करी प्रकरणात झाले होते दोनदा निलंबित 


धानोरा (गडचिरोली):

धान कापणी आणि मळणीच्या हंगामात एक भीषण अपघात समोर आला आहे. धानोरा तालुक्यातील मुरमाडी येथे धान मळणी सुरू असताना, थ्रेशर मशीनमध्ये अडकून एका ३० वर्षीय निलंबित वनरक्षकाचा जागीच मृत्यू झाला. सचिन देवराम हलामी असे मृतकाचे नाव असून, ही घटना बुधवारी (२१ जानेवारी) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन हलामी हे मूळचे ईरुपटोला येथील रहिवासी होते. बुधवारी ते मुरमाडी येथील शेतकरी विकास शेंडे यांच्या शेतात धान मळणीचे काम करण्यासाठी गेले होते. मळणी सुरू असताना अचानक सचिन यांचा तोल गेला आणि ते सुरू असलेल्या थ्रेशर मशीनमध्ये ओढले गेले. क्षणार्धात त्यांचे अर्ध्याहून अधिक शरीर मशीनमध्ये अडकले. मशीनचा वेग प्रचंड असल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि असह्य वेदनांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.


हा सर्व प्रकार इतक्या वेगाने घडला की सोबत असलेले मजूर आणि सहकारी काहीही करू शकले नाहीत. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मशीनमध्ये खेचले गेल्याचे पाहताच एकच खळबळ उडाली, मात्र त्यांना वाचवणे अशक्य होते.


सचिन हलामी हे यापूर्वी वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, लाकूड तस्करीच्या एका गंभीर प्रकरणात त्यांचे नाव आल्याने त्यांच्यावर दोनदा निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. निलंबनानंतर ते गावातच आपल्या कुटुंबासोबत राहत होते. उपजीविकेसाठी त्यांनी उमाजी जनबंधू यांच्या ट्रॅक्टरवर चालक आणि हमाल म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.


सचिन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या कर्त्या पुरुषाचा असा भीषण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा उपपोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !