शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा गणपूर केंद्रात उत्साहात साजरा
आष्टी:-
चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत केंद्र गणपूर येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी नियोजन करणे तसेच शिक्षकांना शैक्षणिक कार्यासाठी नवी दिशा देणे या उद्देशाने शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला चामोर्शीचे गटशिक्षणाधिकारी आखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सौ. पोतराजे केंद्रप्रमुख सहारे आणि मुख्याध्यापक कल्याणम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक नवोपक्रम, विद्यार्थीकेंद्री अध्यापन, शाळा विकासाचे नियोजन तसेच शिक्षकांच्या विविध शैक्षणिक जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
सेवापूर्ती सोहळ्याने वातावरण भावूक
याच कार्यक्रमात गणपूर केंद्रातील प्रदीर्घ शैक्षणिक सेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेले शिक्षक ओमप्रकाश झाडे , मोहन पडिशाला आणि वाटगुरे यांचा सेवापूर्ती निमित्ताने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देताना शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि ज्ञान हे त्यांच्या सेवेनंतरही अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहते, असे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले.
“शिक्षक सेवानिवृत्त होतो, पण त्याने दिलेले ज्ञान, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केलेली प्रेरणा कधीच निवृत्त होत नाही,” या भावनेने सेवापूर्ती सोहळ्याचे वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख कपिल सहारे, संतोष नागरगोजे , नागुलवार आणि गणपूर केंद्रातील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी सेवानिवृत्त शिक्षकांना निरोगी, आनंदी व समाधानी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षण परिषद आणि सेवापूर्ती सोहळा हा शैक्षणिक चिंतनासोबतच कृतज्ञता, सन्मान आणि प्रेरणेचा सुंदर संगम ठरला. प्रास्ताविक सहाय्यक शिक्षक नागुलवार सूत्रसंचालन अजय मेश्राम यांनी केलं तर अम्मावार यांनी आभार मानले.

