सोमनपल्ली गावात प्रवेश बंदीचा फलक लाऊन, ग्रामसभा घेऊन केला भूमी अधिग्रहणाचा विरोध
सोमनपल्लीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
आष्टी:- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील लोह प्रकल्पाकरिता परिसरातील जमीन हस्तांतरण करण्याचा शासनाचा डाव हाणून पाडण्यासाठी सोमनपल्ली गावात प्रवेश बंदीचा फलक लाऊन तसेच ग्रामसभा घेऊन विरोध करण्यात आला आहे
महाराष्ट्र शासनाने कोनसरी परिसरातील कोनसरी, जैरामपूर, मुधोली तुकूम, मुधोली चक नं. 2, पारडीदेव आणि सोमनपल्ली या गावाच्या हद्दीतील एकूण 898.8422 हेक्टर जमिन शासनाने खाजगी व सरकारी क्षेत्र भुमी अधिग्रहण करण्याचा आदेश काढलेला आहे. या विरोधात बाधित गावातील नागरीक आक्रमक पवित्रा घेत असून गावांमध्ये शासनाचे प्रतिनिधी व कंपनीच्या प्रतिनिधींना प्रवेश निषिध्द असल्याचे फलक लावले आहे.
आज 5 डिसेंबर रोजी सोमनपल्ली येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रामस्थांनी या भूमी अधिग्रहणाला तिव्र विरोध केला. या विषयावर आम्हाला कोणतीही चर्चा नको, कोणताही प्रकल्प नको यामुळे शासनाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी किंवा कंपनीच्या प्रतिनिधींना गावात प्रवेश नाही अशी भूमीका ग्रामस्थांनी घेतलेली आहे.
सोमनपल्ली सह कोनसरी, मुधोली चक नं. 2, मुधोली तुकूम, जैरामपूर या गावांनी आपआपल्या गावातील मुख्य रस्त्यांवर बॅनर लावून सदर प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष वेधून घेतले आहे.


