नौकरी करु नकोस म्हणून बायकोवर केला चाकुहल्ला
अशोक खंडारे मुख्य संपादक
ठाणे:-
बायकोला नोकरी करण्यास मनाई केल्यानंतरही ती ऐकत नसल्याने नवऱ्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागातील शहाडमधील ओम कृष्ण पुरम सोसायटीच्या गेटवर १२ मे रोजी घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्लेखोर नवऱ्यावर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शशिकांत पांडुरंग शेट्टी (वय 45 वर्षे, रा. वायलेनगर कल्याण) असे नवऱ्याचे नाव आहे. तर रंजिता (वय 38 वर्षे) असे जखमी बायकोचे नाव आहे.
ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर नवरा शशिकांत हा कल्याण पश्चिम भागातील वायलेनगर मधील वेदांत सोसायटीत राहतो. त्याच्या पहिल्या बायकोचे निधन झाल्याने तीन महिन्यापूर्वीच त्याने रंजितासोबत दुसरे लग्न केले. तसेच रंजिताच्याही पहिल्या नवऱ्याचे निधन झाले आहे. ती ही मुबंईतील विद्याविहार भागात असलेल्या इंडिया हेल्थ इन्शुरन्स' कंपनीत नोकरीला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून दोघा नवरा-बायकोमध्ये नोकरी करण्यावरून वाद होत होते. याच वादातून बायकोने नवऱ्याचे घर सोडले. ती शहाडमधील ओम कृष्ण पुरम सोसायटीत राहणाऱ्या आपल्या आईकडे राहून नोकरीच्या ठिकाणी जात होती..
बायकोवर चाकूहल्लाः रंजिता ही 12 मे रोजी शुक्रवारी सकाळच्या
सुमारास नोकरीवर जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान नवऱ्याने
तिला सोसायटीच्या गेटवर अडविले आणि तिच्यावर चाकूहल्ला केला. बायको जमिनीवर पडल्याने पाहून हल्लेखोर घटनास्थळावरून
फरार झाला.
रुग्णालयात उपचार सुरूः रंजिता सोसायटीच्या गेटवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून तिच्या नातेवाईकाने सोसायटीतील रहिवाशांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रंजिताच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हल्लेखोर नवऱ्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या आधारे हल्लेखोर नवऱ्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे करीत आहेत.