निर्वाचन आयोगाने लावले शिक्षकांना आपल्या कामात , विद्यार्जनाचे काय? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

0

निर्वाचन आयोगाने लावले शिक्षकांना आपल्या कामात , विद्यार्जनाचे काय? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 



वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली : जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांनी नियमित अध्यापनावर अधिक लक्ष देणे गरजेचे असताना, निवडणूक विभागाकडून शिक्षकांना विविध निवडणूकविषयक कामांसाठी नियुक्त केले जात असल्याने शाळांमधील अध्यापन व्यवस्थेवर परिणाम होतो आहे. त्यामुळे शिक्षक निवडणूक कामातून मुक्त होऊन विद्यार्थ्यांच्या वर्गात परतणार तरी कधी?, असा प्रश्न पालक आणि शिक्षणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यासाठी विविध शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचीही नियुक्ती केली जाते. मात्र, शिक्षकांना वारंवार निवडणूक कामे, प्रशिक्षण आणि संबंधित प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये गुंतविल्याने त्यांचा शाळेतील प्रत्यक्ष अध्यापनासाठी उपलब्ध होणारा वेळ कमी होत तर आहेच शिवाय दिवसभर शिक्षक उपलब्ध होत नसल्याची बाब चर्चेत आली आहे.

गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये आधीच शिक्षकांची संख्या मर्यादित आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध शिक्षकांपैकी काही शिक्षक निवडणूक कामावर गेल्यास त्याचा थेट परिणाम नियमित अध्यापनावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे 

अध्यापनाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता

शिक्षक निवडणूक प्रशिक्षण, प्रत्यक्ष निवडणूक कर्तव्य तसेच संबंधित कामांसाठी शाळेबाहेर राहिल्यास अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन प्रभावित होऊ शकते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, सराव घेणे, मूल्यमापन करणे आणि मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देणे या शैक्षणिक बाबींवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

‘निवडणूक कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळ द्या’

शिक्षकांचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देताना शिक्षकांवरील अतिरिक्त निवडणूक जबाबदारीचा भार कमी करावा, अशी मागणी पुढे येत आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने निवडणूक कर्तव्य आणि शैक्षणिक जबाबदारी यामध्ये योग्य समतोल साधण्याची गरज आहे. निवडणूक प्रक्रिया महत्त्वाचीच; मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्याने शिक्षकांना शक्य तितक्या लवकर अध्यापनाच्या कामावर परत आणावे, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !