बल्लारपूर बसस्थानक येथे पत्नीवर पतीने केला चाकूहल्ला, पत्नी गंभीर
पोलीसांनी केली पतीला अटक
प्रेमविवाह असुनही प्राणघातक हल्ला, कारणाचा पोलीस लावतील काय छडा?
बल्लारपूर : घरगुती वादातून पतीने पत्नीवर चाकूहल्ला केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि. ८) दुपारी १:३० वाजता बल्लारपूर बसस्थानक परिसरात घडली. यात पत्नी गंभीर जखमी झाली. जखमी पत्नी सुजाता रूपेश बहुरिया वय २३ वर्षे रा. भगतसिंह वॉर्ड बल्लारपूर हिला पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. आरोपी पती रूपेश दीपक बहुरिया वय २५ वर्षे रा. झाकीर हुसैन वॉर्ड बल्लारपूर याला अटक करण्यात आली आहे.
रुपेश बहुरीया आणि सुजाता यांचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना तीन वर्षाचा मुलगा आहे. मागील काही महिन्यांपासून घरगुती वाद सुरू असल्याने सुजाता ही माहेरी राहत आहे. काही कामानिमित्त सुजाता ही पुण्याला गेली होती. पुण्याहून परतल्यानंतर ती बसस्थानकावर उतरली. तेव्हा आरोपी पती रूपेश तिथे गेला. दरम्यान घरगुती कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या भरात रूपेशने सुजाताच्या मानेवर व खांद्यावर चाकूने वार केले. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी रूपेश हा घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध बीएनएस कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

