एक गाव, एक वाचनालय उपक्रमांतर्गत जिजगाव येथे ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

0

एक गाव, एक वाचनालय उपक्रमांतर्गत जिजगाव येथे ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन 


पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते लोकार्पण ; ग्रंथदिंडीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग


भामरागड (श्रीकृष्ण गावडे) :- पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या “एक गाव, एक वाचनालय” उपक्रमाने गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत. या उपक्रमांतर्गत भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मौजा जिजगाव येथे ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे शनिवारी (दि. १३) उद्घाटन करण्यात आले.
हे वाचनालय गडचिरोली पोलिस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि स्थानिक नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून श्रमदान व लोकवर्गणीतून उभारण्यात आले आहे. या वाचनालयात अभ्यासिका, टेबल, खुर्च्या, कपाटे आणि हजारो पुस्तके उपलब्ध आहेत, ज्यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांना फायदा होणार आहे. उद्घाटन सोहळ्याआधी गावामध्ये एक भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली, ज्यात शालेय विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा करून आणि राष्ट्रध्वज फडकवून मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.२०२३ पासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८,००० हून अधिक तरुण-तरुणींना फायदा झाला आहे. विशेष म्हणजे, या वाचनालयांमधून अभ्यास करून आतापर्यंत २०५ विद्यार्थी शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रभावी उपक्रमांमुळे मागील तीन वर्षांत माओवादी संघटनेमध्ये एकही तरुण किंवा तरुणी भरती झालेली नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, “या वाचनालयाचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. इथून अनेक विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रात यावेत, अशी आमची इच्छा आहे.” ते पुढे म्हणाले की, गडचिरोली पोलीस दल केवळ माओवादाविरुद्ध लढत नाही, तर जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठीही कटिबद्ध आहे.
सदर कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, असिस्टंट कमांडंट ए/९ बटा. सीआरपीएफ अमित सिन्हा, पोस्टे मन्नेराजारामचे प्रभारी अधिकारी पोउपनि शुभम शिंदे, एसआरपीएफ ग्रुप ४, नागपूरचे पोउपनि प्रशांत नरखेडे तसेच परिसरातील सरपंच, पोलीस पाटील,पत्रकार, शालेय विद्यार्थी व स्थानिक प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते, पोस्टे मन्नेराजारामचे प्रभारी अधिकारी पोउपनि. शुभम शिंदे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि चंद्रकांत शेळके व पोस्टे मन्नेराजारामचे अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !