शेकाप नेत्या जयश्री वेळदा
गडचिरोली दि. २१ जुलै
गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आरोग्यवर्धिनी उपकेंद्र संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नेहमी बंद राहत असून सामान्य नागरिकांना उपचारासाठी गडचिरोली शहर जावे लागते. त्यामुळे आरोग्य उपकेंद्राला वाऱ्यावर सोडणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी केली आहे.
शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात जयश्री वेळदा यांनी म्हटले आहे की, मुरमाडी परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा योग्य वेळी मिळाव्यात यासाठी आयुष्यमान भारत अंतर्गत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून सदर आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची निर्मिती केली. मात्र या उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी नियमित हजर राहत नसल्याने परिसरातील नागरिकांना लहान सहान कारणांवरून गडचिरोली शहराकडे उपचारासाठी धाव घ्यावी लागते.
केवळ उपकेंद्रातर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, बैठका, कार्यशाळा यासाठीच या उपकेंद्राचा वापर होत असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे देखभालीसाठी या उपकेंद्रात कोणतीही तरतूद केली गेली नसल्याने हे उपकेंद्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे वाऱ्यावर असल्याचा आरोपही वेळदा यांनी केला आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन सदर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र तातडीने नियमितपणे सुरू करण्यात यावे, अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदे समोर निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिला आहे.

