लोकबिरादरी प्रकल्पात रंगली स्नेहसंगीतप्रतिज्ञाची मैफल
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
भामरागड तालुक्यातील सुप्रसिध्द समाजसेवा केंद्र लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा, येथे गुरुवार दि.१० नोव्हेंबर २०२२ ला कोल्हापूर येथील कलावंतांची स्नेहसंगीतप्रतिज्ञा या संगीताची मैफल रंगली.यावेळी प्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, अमेरिकेतील चंदाताई आटले व रवि आटले,डॉ.दिगंत आमटे, डॉ.अनघा आमटे, अनिकेत आमटे,समिक्षा आमटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
" ना नफ्यासाठी,ना स्वार्थासाठी,आमची कला गरजवंतांच्या आधारासाठी "असे म्हणत समाजातील आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू व्यक्तींसाठी कोल्हापुरातील विविध क्षेत्रात कार्य करणारे कलाकार एकत्र आले.२एप्रिल २०१९ पासून स्नेहसंगीतप्रतिज्ञा या नावाने सलग मैफलीचा Facebook Live कार्यक्रम सुरू केला.सलग १३१९ दिवसांतील हेमलकसा येथे झालेली १५३८ वी संगीत मैफल होती. समाजातील आर्थिक विषमतेवर कृतीशील कार्य करत ही मैफल अन्न,वस्त्र,निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता व समाजातील गरजू व्यक्तींना सक्षम करण्यासाठी हे सर्व कलाकार आपल्या कलेचा वापर करत आहेत.कार्यक्रमातून मिळालेले दान गरजू लोकांना देत आहेत.
आजचा संगीत मैफलचा कार्यक्रम " आजसे पहले,आजसे ज्यादा खुशी आजतक कभी नहीं मिली" या अजरामर गीतांनी सुरु करण्यात आला.अजरामर हिंदी व मराठी गीते, देशभक्ती गीते, भावगीते गाऊन कलावंतांनी श्रोत्यांची मने रिझविली.प्रशांत जोशी यांनी स्वरसाज सांभाळून नरहर कुलकर्णी, अमरसिंह राजपूत, मंजिरी लाटकर,दिलीप माळी, चंद्रशेखर फडणीस, डॉ.मिलिंद गायकवाड आदींनी सुरेल गीते गाऊन मैफलीत रंगत भरली. राजेंद्र चौगुले व निलांबरी फडणीस यांचे संयोजन,ध्वनी संयोजन रमेश सुतार यांनी सांभाळले.सुषमा बटकडली, रघुनाथ पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे शेवटी डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांचे हस्ते सर्व कलाकारांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.गिरीश कुलकर्णी यांनी केले.यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्रीराम झोडे,सचिन मुक्कामाला,प्रा.खुशाल पवार आदींनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रकल्पातील कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

